सध्याच्या लॉकडाउन मुळे आपण सर्वजण घरीच आहोत.
सहाजिकच आपली हालचाल कमी झाली आणि बसणं वाढलं आणि हे प्रमाण आपल्या मुलांमध्ये जास्त आहे.
हल्ली शाळा पण ऑनलाइन आहेत. त्यामुळे त्या वेळी, जेवताना, जास्त वेळ टीवी मोबाईल बघत बसणे इ. मुळे मुलं बसतात जास्त आणि शारीरिक हालचाल कमी होते.
हे चित्र नेहमीची शाळा सुरू असते तेव्हा पण दिसून येतं. अभ्यास, क्लासेस च्या निमित्ताने हे जास्त प्रमाण वाढत. त्याचबरोबर खाण्याच्या सवयी….
त्यामुळे मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात दिसून येतो.
आईवडील आणि आजी आजोबांना हीच मुलं गोंडस आणि गुटगुटीत वाटू लागतात.
‘अजून लहान आहे, खाऊ दे’
‘या वयात कशाला हवाय व्यायाम’
‘आता काय उपाशी रहायचं का’
‘दूध बिस्कीट खा, ताकद येयील’
या अशा सगळ्या विचारांमुळे मुलांचे आरोग्य हे सतत दुर्लक्षित होते.
लहान वयातच मुलांच्या वजनाची खबरदारी घ्यायला हवी.
कारण अगदी चौदा पंधरा वर्षाच्या मुला-मुलींमध्ये मधुमेह, थायरॉईड, पी सी ओ एस अनियमित पाळी , होर्मोनची अनियमितता असे अनेक प्रकार दिसून येतात.
लहान वयातला लठ्ठपणा लहान वयातच जरा आटोक्यात नाही आणला तर मोठेपणी ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे थोडेसे आवलोकन करणे गरजेचे आहेत ते या प्रकारे –

  • दिवसभरात मुलांचे एका ठिकाणी बसण्याचे प्रमाण किती आहे – याची नोंद ठेवावी
  • मुलांच्या पूर्ण दिवसभराच्या खाण्याची नोंद करा. त्यात जे पदार्थ तळलेले , बाहेरचे , गोडाचे , चोकोलेट , बिस्कीट या सगळ्या पदार्थांना अधोरेखित करा.
  • व्यायाम आणि खेळाच्या वेळा पण लिहून ठेवा.

अशा नोंदी केल्या तर तुमचं तुम्हालाच समजेल की आपल्या मुलांचा जास्त वेळ बसण्यात जातो आणि त्याचबरोबर असंतुलीत आहार.
मग लठ्ठपणा वाढणारच.
आणि फक्त एवढेच नाही तर मुलं आळशी आणि चिडचिडी पण होतात.
यावर उपाय या वयातच केला पाहिजे.
या वयापासून जर आपण मुलांना व्यायाम , खेळ , मेडिटेशन आणि संतुलित आहाराची सवय लावली तर पुढे जाऊन याचा त्यांना त्रास होणार नाही.
सध्या आपण घराबाहेर नाही जाऊ शकत, त्यामुळे घराच्या घरी काय करू शकतो ते बघूया.
1. सर्वप्रथम मुलांशी याविषयी बोला. पण बोलताना फ़क्त सल्ला किंवा लेक्चर देऊ नका. तू हे कर किंवा तू ते कर असे सल्ले दिले तर मुलं मुळीच लक्ष देणार नाहीत.
अशा पद्धतीने सांगा की ‘चल आपण आजपासून व्यायाम करायचा का ? एक नवीन डान्स वीडियो आहे , बघूया का करून ? ई.
तुम्हालाही त्यांच्यासोबत हे करावं लागेल.
त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक फिटनेस ग्रुप बनवा आणि त्यात सेल्फी चेलेंज सुरू करायला सांगा.
त्यासाठी का होईना, मुलं थोडासा तरी व्यायाम करायला लागतील.

2. हल्ली सगळीकडे e-schooling सुरू झालय, मुलं उठतात आणि लगेच कंप्युटर समोर बसतात.
अशाने मेंदूची कार्यक्षमता, विचारांची शक्ती आणि एकाग्रता कमी होते.
डोळ्यांचे आरोग्य बिघडते ते वेगळेच.
म्हणून मुलांना त्यांचा अभ्यास सुरू व्हायच्या एक तास आधी उठवा (त्यासाठी रात्री वेळेत झोपणे जास्त गरजेचे आहे)
स्वच्छ तोंड धुवून, भरपूर पाणी पिऊन मग सुर्यनस्कार घालायला लावा.
त्यानंतर त्यांना निदान 5-10मिनिटे मेडिटेशन मधे बसायला सांगा. हवं तर एखादं शांत संगीत लावा.
अशाने त्यांच मन शांत होइल आणि अभ्यासाला बसायच्या आधी मेंदू आपलं कार्य योग्य दिशेने करायला लागेल.

3. दर एक ते दोन तासांनी छोटे छोटे व्यायाम करायला लावा. जसे दोरीउड्या, दोन जिने पळत वर खाली करणे, stretching इ.
त्याच बरोबर घरातल्या छोट्या छोट्या कामांत मदत करायला सांगा. म्हणजे जास्तीत जास्त शारीरिक हालचाल होईल.

4. आहारात जास्तीत जास्त कडधान्य, भाज्या आणि फळांचा समावेश करावा. गोडाचे पदार्थ , तळलेले , मैद्याचे पदार्थ , आइस्क्रीम चोकोलेट कमी प्रमाणात खावे.
अधे मधे भूक लागल्यावर फळं , शेंगदाणे फुटाणे , सुका मेवा , काकडी असे काहीही खाल्ले तरी चालेल.
आणि त्याबरोबर दिवसभर भरपूर पाणी पिणे.
लक्षात असू द्या, हे सगळे बदल एका दिवसात नाही होणार , त्यासाठी आधी पालकांनी स्वतः मधे थोडेसे बदल करणे आवश्यक आहे.
लहानपणापसुन जर मुलं हे सगळं करू लागली तर नक्कीच त्यांच्या पुढच्या आयुष्यात निरोगी राहतील.
आपल आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे हे मूळ लहानपणापासुनच रुजवणे खुप गरजेचे आहे.
म्हणजे जेव्हा मुलं नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर जातील तेव्हा खाण्याच्या अणि व्यायामाच्या योग्य सवयी त्याना खूप मदत करतील.

नंतर उशीर होण्याआधीच….सावर रे……
Dr. Rashmi Shah.
Specialist Fitness & Nutrition.
Child Nutrition Specialist.
Nutritionallyurs@gmail.com
9112053053